पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर पिंपरी गाव येथील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेकरिता लावण्यात आलेले सर्व अनधिकृत फ्लेक्स हटवत कारवाई केली आहे. या फ्लेक्सवर कारवाई करण्याकरिता आज (दि.०५) सकाळी महापालिकेचे पथक दाखल झाले होते. मात्र राजकीय दबावामुळे हे पथक कारवाई न करताच परत फिरले होते. याबाबतची बातमी Pclive7.com ने प्रसिद्ध केली होती. पालिका प्रशासनाने या बातमीची दखल घेत तातडीने या सर्व अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीगाव येथे दि.४ मे ते १९ मे या कालावधीत भव्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीतील नवमहाराष्ट्र मैदानावर या स्पर्धा होत असून मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागताचा भला मोठा अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आला होता. तसेच पिंपरी गाव परिसरात अनेक ठिकाणी या आमदार तसेच स्पर्धेचे अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले होते. आज (दि.०५) रोजी सकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झाले होते. मात्र स्पर्धा आयोजकांच्या समर्थकांनी या ठिकाणी मज्जाव करत या अतिक्रमण विरोधी पथकाला हुसकावून लावले होते. फ्लेक्स काढूनच दाखवाचं मग बघू काय होते ते.. असा दम देखील अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. शेवटी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांनी फोन केला आणि कारवाई न करताच तेथून परतण्याची वेळ पथकावर आली होती.

दरम्यान “पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईला गेलं.. फोन आला.. आणि कारवाई न करताच पथक परत फिरलं..!” या मथळ्याखाली Pclive7.com ने बातमी प्रसिद्ध केली. या बातमीनंतर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सर्व स्तरातून होत असलेले टीका पाहताच अतिक्रमण विभागाने तातडीने या ठिकाणी येत सर्व अनधिकृत फ्लेक्स वर कारवाई केली आहे.
