चाकण (Pclive7.com):- कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. त्यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पीडित महिला रात्रपाळीसाठी कंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत निर्जनस्थळी नेले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्नही केला. तिने आरोपीला चावाही घेतला. मात्र, तिच्यावर अत्याचार करून तो पसार झाला. त्यावेळी एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात होते. त्यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून पीडित महिलेने पोलिसांना बोलावून घेतले.
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.