पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीमधील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये १२ श्वानांना विष देऊन मारल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी तपास करत अखेर संशयितास अटक केली. अलौकिक राजू कोटेचा (३७, महिंद्रा अँथिया सोसायटी, पिंपरी) असे त्याचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी परिसरातील मध्यवर्ती भागात महिंद्रा अँथिया नावाची मोठी सोसायटी आहे. १४ एप्रिलला सकाळी या सोसायटीमध्ये वावरणाऱ्या १२ श्वानांवर विषप्रयोग केल्याचे उघड झाले. विषप्रयोग केल्यानंतर तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान आणखी नऊ श्वानांचा मृत्यू झाला.
सोसायटीच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून २० ते २२ भटके श्वान राहत आहेत. श्वानांवर विषप्रयोग केल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच साक्षीदारांकडे तपास केला. त्यात संशयिताचे निष्पन्न झाले. त्याला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. घटना घडण्यापूर्वी तो सोसायटी परिसरात मोटारीमधून सातत्याने फिरत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाइलची पाहणी केली. त्यामध्ये काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या.