पिंपरी (Pclive7.com):- मिळकतकर आकारणीसाठी शहरातील मिळकतींची विभागणी तीन ऐवजी दोन विभागात करण्याचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. त्यावर स्थायी समितीने मान्यताही दिली आहे, यामुळे करवाढ होणार असल्याने नागरिकांवर अतिरिक्त बोजा नको अशी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला आणि प्रशासनाकडून स्पष्टता मागितली.

पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (दि.५ मे) पार पडली. यावेळी कर दरवाढ विषय चर्चेत आला. कर आकारणीसाठी महापालिका करसंकलन विभागाने शहरातील मिळकतींची विभागणी अ, ब आणि क अशा तीन विभागात केली आहे. समाविष्ट गावातील वाढती बांधकामे आणि गृहनिर्माण सोसायट्यामुळे सर्व मिळकतींची विभागणी अ व ब अशा दोन विभागात करावी, असा प्रस्ताव भाजप सदस्य बाबासाहेब त्रिभुवन व योगिता नागरगोजे यांनी सर्वसाधारण सभेत मांडला.

या प्रस्तावाला स्थायी समितीने १६ मार्च रोजी मंजुरी दिली आहे. परंतु, शहरात पाण्यासह विविध नागरी समस्या गंभीर असताना करवाढ कशासाठी? समतोल सुविधांवर ठरत असल्याने अगोदर सुविधा द्या, नंतर कर रचनेची विभागणी करा, अशी आक्रमक मागणी भाजप सदस्य राहुल कलाटे यांनी केली. हाच धागा पकडत भाजपचे विकास डोळस, उत्तम केंदळे, निलेश नेवाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास साने, शिवसेनेचे राजेंद्र तरस यांनीही करवाढ करू नये, अशी मागणी केली. त्यावर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रशासनाची बाजू घेत समतोल साधण्यासाठी कर आकारणी पद्धतीची विभागणी अ व ब अशा दोन विभागात केली असल्याचे सांगितले. तर भाजप गटनेते प्रशांत शितोळे यांनी अभ्यासासाठी विषय १५ मेपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली. ती महापौर रवी लांडगे यांनी मान्य करत विषय तहकूब केला.
वाकड, ताथवडे, पुनावळे, चिखली, चऱ्होलीसह महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात नवीन कर विभागणी पद्धतीमुळे नव्याने तयार होणाऱ्या सदनिका आणि व्यावसायिक मालमत्तांवर करवाढ होणार आहे. नागरिकांना अपुऱ्या सुविधा असताना वाढीव कराचा बोजा नको. अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी ठाम भूमिका आहे. तसेच मोकळ्या जागा आणि इतर कर रचनेवर प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि नवीन करपद्धती अमलात आणताना त्यातील तज्ञ समिती नेमून निर्णय घ्यावा.– राहुल तानाजी कलाटे,नगरसेवक, भाजपा




















Join Our Whatsapp Group