– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठा असणारा बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ सिनेमा महाराष्ट्र दिनी सर्वत्र प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासूनच भरभरून प्रतिसाद दिला आहे. जवळपास दहा वर्षांपासून या सिनेमाविषयी चर्चा सुरू होती. अनेक मोठी नावे सिनेमाशी जोडली गेली. अनेक प्रकारचे अडथळे येत गेले. बरेच बदल झाले. मात्र, ठाम निर्धार आणि बऱ्याच खडतर प्रवासानंतर अखेर २०२६ मध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग सुकर झाला. लोकप्रियतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘धुरंधर २’ सिनेमा दरम्यान ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला, त्यामुळे या सिनेमाबाबतची माहिती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकली.

‘राजा शिवाजी’ सिनेमाबाबत सोशल मिडीयावर सातत्याने चर्चा सुरू होती. तो नेमका कसा आहे, यावर बरेच तर्कवितर्क होते, दावे-प्रतिदावे केले जात होते. सिनेमाचे प्रदर्शन जवळ येऊ लागले, तसतसे काही वाद घडवून आणले जात होते. अर्थातच त्याला राजकीय व अन्य बरेच कंगोरे होते. यापैकी कोणत्याही वादात न पडता केवळ शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी सिनेमा पहायचा, अशी ठाम भूमिका शिवप्रेमींनी घेतली होती. मराठीत अशाप्रकारच्या सिनेमाची निर्मिती पहिल्यांदाच होत होती.
म्हणूनच, सिनेमा प्रदर्शित होताच भल्या सकाळी पहिल्या शो पासून सगळीकडे विक्रमी गर्दी झाल्याचे दिसून आले. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषेत तयार झालेल्या या सिनेमाचा कालावधी तीन तासांहून अधिक आहे. शिवबाचा जन्म ते अफजलखानाचा वध या दरम्यानच्या काही निवडक घटनांचा समावेश या सिनेमात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य सिनेमा बनवण्याचे स्वप्न रितेश विलासराव देशमुख याने उराशी बाळगले होते. उशिरा का होईना, ते पूर्ण झाले, असे म्हणता येईल.
‘धुरंधर’च्या अफाट यशानंतर ‘जिओ’ने निर्माता म्हणून आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी सिनेमात हिंदीतील दिग्गज अभिनेत्यांची फौज, हे ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत व्हायचे असे की, मराठीचा आघाडीचा कलावंत हिंदीत घरगडी, ड्रायव्हर, शिपाई अशा दुय्यम भूमिका करायचा. त्याचवेळी इतर प्रांतातील अभिनेते मात्र नायकाच्या भूमिकेत झळकत होते. मराठी माणसांच्या मनात ही सल वर्षानुवर्षे होती. ‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने प्रथमच असे घडले की, हिंदीतील लोकप्रिय अभिनेते मराठी सिनेमात दिसले आहेत आणि सिनेमाचा नायक मराठी आहे. इतर प्रमुख भूमिकेतही मराठीच कलाकार आहेत.
रितेश देशमुख, जिनीलिया देशमुख यांच्यासह संजय दत्त, सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. याशिवाय, अशोक समर्थ, सुरेश विश्वकर्मा, सिध्दार्थ जाधव, सुहास शिरसाट, राहूल महाजन यांच्यासह रितेशचे बंधू धीरज देशमुख, रितेशची दोन्ही मुले राहिल आणि रियान, अतुल गोगावलेचा मुलगा आर्य असे अनेक मराठी चेहरे सिनेमात दिसतात.

दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सिनेमाचे संगीत. .
मराठमोळ्या प्रेक्षकांची अचूक नाडी ओळखणाऱ्या आणि हिंदीतही आपला दबदबा निर्माण केलेल्या अजय-अतुल गोगावले यांनी पुन्हा एकदा आपली संगीतमय जादू दाखवून दिली आहे. यापूर्वी रितेशच्या ‘लई भारी’, ‘माऊली’ आणि ‘वेड’ या सिनेमांचे संगीत याच जोडीने दिले होते. पंढरपूरच्या आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवरचे ‘माऊली माऊली’ हे त्यांचे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले होते. या गाण्याला भजनाचा तथा आरतीचा अघोषित दर्जा मिळाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अजय अतुलने ‘राजा शिवाजी’मध्ये ज्या पध्दतीचे पार्श्वसंगीत दिले आणि ज्या तोडीची गाणी दिली आहेत, (विशेषत: अँथम) त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. चकचकीत आणि खर्चिक सिनेमा, हे आणखी एक वैशिष्ट्य दिसून येते. कमी बजेट, हे मराठी सिनेमांचे कायमच रडगाणे राहिले आहे. मात्र, यावेळी बजेटची मर्यादाच नसावी. होऊ द्या खर्च, पण दर्जात तडजोड नाही, अशी भूमिका ठेवूनच सिनेमांची निर्मिती करण्यात आली, त्याचा प्रत्यय थिएटरमध्ये सिनेमा पाहताना येतो.
मांढरे बंधू ते रितेश देशमुख…
छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारणे, हे प्रत्येक अभिनेत्यासाठी सन्मानाचे राहिले आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी आपआपल्या परीने ही आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. शिवाजी महाराज म्हटले की, आजही डोळ्यासमोर चंद्रकांत व सूर्यकांत मांढरे या अभिनेत्यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. इतक्या वर्षानंतरही त्यांचा प्रभाव कायम आहे. याशिवाय, रवींद्र महाजनी, महेश मांजरेकर, डॉ. अमोल कोल्हे, शरद केळकर, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, शंतनू मोघे, सुबोध भावे, भूषण प्रधान, सिध्दार्थ बोडके अशा अनेकांनी महाराजांची भूमिका साकारली आहे. ‘दुरदर्शन’वर गाजलेल्या ‘भारत एक खोज’ या हिंदी मालिकेत नसीरूद्दीन शहा यांनी तर, शिवाजी गणेशन या दाक्षिणात्य सुपरस्टारनेही महाराजांची भूमिका केली. याशिवाय, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटात अक्षय कुमार हा देखील शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्रोलिंग आणि कौतुकही…
या सिनेमात रितेशने शिवछत्रपतींची भूमिका केली, त्यावरून ट्रोलिंग झाले आणि कौतुकही झाले आहे. रितेशने महाराजांची भूमिका समर्थपणे साकारली. महाराजांचे व्यक्तीमत्व पडद्यावर अक्षरश: जीवंत केले, अशा भावना प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जातात. त्याचवेळी अनेकांनी काही नकारार्थी मुद्देही मांडले आहेत. महाराजांच्या भूमिकेसाठी रितेशची निवड योग्य नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर महाराजांचे तेज दिसत नाही. पडद्यावर त्याची शरीरयष्टी किरकोळ वाटते, चेहरा थकलेला आणि निराश वाटतो. लेखक, निर्माता, दिग्दर्शक अशा सगळ्याचं महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रितेशच्या खांद्यावर होत्या. त्यातच महाराजांची भूमिकाही स्वत:च करण्याचा निर्णय त्याने घेतला. यातून येणाऱ्या सर्व ताणतणावाचा परिणाम रितेशच्या कामावर झाला असावा, असे म्हणतात.
महाराजांच्या भूमिकेसाठी रितेशने स्वत:ऐवजी एखाद्या दमदार, अनुभवी आणि महाराजांच्या व्यक्तीरेखेशी अनुरूप अभिनेत्याची निवड करायला हवी होती, असे मत मांडले जाते. एकीकडे असे असले तरीही सिनेमा पाहून आलेल्या बहुसंख्य प्रेक्षकांना रितेशची भूमिका मनापासून आवडते आहे. म्हणूनच ट्रेलरनंतर व्यक्त होणारी नाराजी, ट्रोलिंग सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मात्र दिसून येत नाही. किंबहुणा, सर्वत्र रितेशचे कौतुकच होत आहे.
राजमाता जिजाऊ.. सुलोचना ते भाग्यश्री…
शिवाजी महाराजांच्या आयुष्यात राजमाता जिजाऊंचे खूपच महत्व होते. सिनेमात भाग्यश्रीने जिजाऊंची भूमिका साकारली. यापूर्वी, सुलोचना, नीना कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, रिमा लागू, भार्गवी चिरमुले, निशीगंधा वाड, स्मिता शेवाळे, तेजस्विनी पंडीत, स्मिता देशमुख, अमृता पवार आदी अभिनेत्रींनी आपआपल्या परीने जिजाऊंची भूमिका साकारलेली आहे. त्यामुळे भाग्यश्रीने साकारलेल्या जिजाऊंची तुलना इतरांच्या कामाशी होणे स्वाभाविक आहे. राजमाता जिजाऊंचा करारीपणा, बाणेदारपणा भाग्यश्रीला दाखवता आला का ? जिजाऊंच्या भूमिकेला तिने न्याय दिला का ? असा प्रश्न सिनेमा पाहताना पडू शकतो.
नामवंत कलाकारांमुळे रंगत..
हिंदीतील नामवंत कलाकारांमुळे सिनेमा रंगतदार होण्यास मदतच झाली आहे. संजय दत्तने नेहमीच्या ठसकेबाज पध्दतीने अफजलखानाची भूमिका वठवली आहे. ‘बडी बेगम’ साकारलेली विद्या बालन लक्ष वेधून घेते. तितकाच अमोल गुप्तेचा आदिलशहा लक्षात राहतो. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर यांच्या भूमिका खूपच आटोपशीर ठेवल्या आहेत. ‘सईबाई’च्या भूमिकेत असलेल्या जिनीलियाचे मराठी शब्दोच्चार खटकतात. तिच्याऐवजी एखादी अस्सल मराठमोळी नायिका घ्यायला हवी होती का ?
अभिषेक बच्चन याने संभाजीराजे भोसले (शिवरायांचे ज्येष्ठ बंधू) ही व्यक्तीरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून संभाजीराजांचा अपरिचित इतिहास प्रकाशात आला आहे. मात्र, अभिषेक आणि रितेश हे पडद्यावर सख्खे भाऊ शोभतात का ? जीवा महालाच्या भूमिकेत असलेल्या सलमान खानच्या ‘इंन्ट्री’वर थिएटरमध्ये प्रचंड शिट्टया, टाळ्या पडतात. एका मिनिटाच्या भूमिकेतही सलमान सिनेमागृहातील माहोल पूर्णपणे बदलून टाकतो. मात्र, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जीवा महाला या व्यक्तीरेखेला सलमान न्याय देतो का ?
महाराजांच्या जीवनात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या व्यक्तीरेखा अपुऱ्या भासतात. अनेक कलाकारांचे उच्चार स्पष्ट नसल्याचे जाणवते. ऐतिहासिक दृष्टीने मांडणीत सुसुत्रता दिसत नाही. काही गोष्टी अतार्किक वाटतात. आवेशपूर्ण, धारदार संवाद अपेक्षित होते, ते नाहीत. कथानक आणि सादरीकरणाविषयी अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात.
मराठ्यांच्या अस्मितेचे केंद्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा आणि निर्माण होणारी वादळे, हे समीकरण आता नवीन राहिलेले नाही. ‘राजा शिवाजी’ सिनेमाने पडद्यावर येण्याआधीच प्रश्नांची सरबत्ती झेलायला सुरुवात केली होती. शिवाजी महाराज हे युगपुरूष, ‘आदर्शवत’ नायक आहेत. मराठी माणसाच्या अस्मितेचे केंद्र आहेत. त्यांचे आयुष्य आधीच नाट्यमय आणि थरारक आहे. त्यात कृत्रिम नाट्य घालण्याची गरज नाही. महाराजांवर सिनेमा काढणे ही केवळ संधी नसून मोठी जबाबदारी आहे. हा सिनेमा परिपूर्ण नक्कीच नाही. त्यात बऱ्याच उणीवा आहेत, हे नाकारता येणार नाही. मात्र, तो महत्वकांक्षी, प्रामाणिक आणि मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक टप्पा ठरणारा सिनेमा आहे. त्यामुळे सगळे किंतू, परंतू, शंका-कुशंका बाजूला ठेवून कुटुंबासह थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहिला पाहिजे. शिवाजी महाराजांचे कार्य, मराठा साम्राज्याच्या विस्तारासह संपूर्ण इतिहास देशभरात आणि जगभरात नव्याने पोहोचवण्याचे काम या सिनेमाच्या माध्यमातून होणार आहे. प्रचंड कष्ट, खर्च करून भव्यदिव्य स्वरूपाचा हा सिनेमा तयार करण्यात आला आहे, त्या प्रामाणिक प्रयत्नांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.




















Join Our Whatsapp Group