पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरी परिसर, दुर्गा देवी टेकडी, रावेत, म्हस्के वस्ती आदी भागांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची हालचाल आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्टपणे कैद झाली असून, त्या फुटेजच्या आधारे वनविभागाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ॲम्युनिशन फॅक्टरीचा विस्तीर्ण परिसर आणि दुर्गा देवी टेकडीचा डोंगराळ भाग यामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्या तरी वनविभागाची विशेष पथके विविध भागांत तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये तसेच पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या वनविभागाकडून या भागात गस्त वाढवण्यात आली असून, बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.




















Join Our Whatsapp Group