पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध प्रभागांमध्ये फूटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते १५ मे दरम्यान शहरात पदपथ मुक्त पंधरवडा मोहीम आखान्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील विविध भागात मुख्यालय अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे.

फ प्रभागात २ व ३ मे रोजी RTO रोड, त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौक, तसेच देहू-आळंदी रोड परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत टपऱ्या, हातगाड्या, प्लास्टिक कॅरेट, लोखंडी रॅक, स्टँड बोर्ड, खुर्च्या, टेबल यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. तसेच भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडील टमाटर, भेंडी, बटाटा, काकडी, मिरची यांसारखा शेकडो किलो भाजीपाला जप्त करून इस्कॉन अन्नामृत अन्नछत्र येथे जमा करण्यात आला.
याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १, चिखली येथे सत्संग रोड ते पिंगळे चौकपर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला असून सर्व हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.
इ क्षेत्रीय कार्यालय भोसरी अंतर्गत ३ व ४ मे रोजी आळंदी रोड व भोसरी नाट्यगृह परिसरात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत हातगाड्या, इलेक्ट्रिक काटे, स्टँडी बोर्ड, टेबल, छत्र्या तसेच कपडे व चप्पलांचे गाठोडे जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी MSF जवान, पोलीस कर्मचारी व महापालिका कर्मचारी यांचा समन्वय ठेवण्यात आला.
ड प्रभाग, रहाटणी परिसरात ४ मे रोजी जगताप डेअरी ते पिके चौक, कुणाल आयकॉन रोड व गोविंद गार्डन परिसरात मोहीम राबविण्यात आली. येथे कूलर, हातगाड्या, पाणीपुरी ठेले, प्लास्टिक कॅरेट यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. तसेच फळ विक्रेत्यांकडील आंबे, केळी व नारळ मोठ्या प्रमाणात जप्त करून अन्नछत्रात जमा करण्यात आले.
याशिवाय पिंपळे सौदागर परिसरातही फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असून ह झोनमध्येही पदपथ अतिक्रमणमुक्त मोहिमेला गती देण्यात आली आहे.
महापालिकेने जप्त केलेले सर्व साहित्य संबंधित गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले असून, नागरिकांनी सार्वजनिक रस्ते व फूटपाथ मोकळे ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास आणि पादचाऱ्यांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध होण्यास मोठी मदत होत आहे.

कारवाईवेळी सहभागी कर्मचारी..
सदर अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक, बीट निरीक्षक, प्रशासन अधिकारी तसेच विविध प्रभागांतील अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले होते. या मोहिमेत एम जवानांची मोठ्या प्रमाणावर मदत घेण्यात आली असून, महापालिकेचे कर्मचारी, कंत्राटी मजूर, ड्रायव्हर, कॅमेरामन तसेच पोलीस कर्मचारी यांनी समन्वय साधून कारवाई यशस्वी केली. विविध प्रभागांमध्ये संबंधित बीट निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून, सर्व घटकांनी संयुक्तपणे काम करत शहरातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली.
कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य (एकत्रित तपशील)
साहित्य प्रकार :
टपऱ्या – ०४
हातगाड्या – १५
सोडागाडी – ०१
कूलर – २५
इलेक्ट्रिक काटे – ०३
लोखंडी काटे – ०१
प्लास्टिक टेबल / लोखंडी टेबल – ०५
प्लास्टिक / लोखंडी खुर्च्या – ०७
स्टँडी बोर्ड – १३
लोखंडी रॅक / फ्रेम – ०४
छत्र्या / छत्री स्टँड – ११
पंखे (स्टँडसह) – ०४
प्लास्टिक कॅरेट – १०२
लाकडी कॅरेट – ०८
दुधाचे कॅरेट – २४
टायर (मोठे/छोटे) – १४
टायर ट्यूब – १०
लाकडी प्लायवूड – १४
ताडपत्री – ०२
नेट जाळी – ०१
कागदी बॉक्स – २५
पाणी जार – ०३
प्लास्टिक बकेट / डस्टबिन – ०३
लोखंडी भट्टी बॅरल – ०१
कपडे गाठोडे – ०७
चप्पल गाठोडे – ०२
भाजीपाला व फळे (अन्नछत्रात जमा) :
टमाटर – ८० किलो
मिरची – ४० किलो
भेंडी – ७० किलो
गवारी – ६० किलो
दोडका – ३० किलो
वांगी – ३५ किलो
शेवगा – १५ किलो
तोंडली – १० किलो
काकडी – ५० किलो
अद्रक – ०८ किलो
गोसावळे – २० किलो
कोबी – १५ किलो
दुधी भोपळा – २५ किलो
बटाटा – १०० किलो
काशिफळ भोपळा – ०७ नग
कारले – ०५ किलो
कलिंगड / पपई – प्रत्येकी ०१ कॅरेट
आंबे – १३ कॅरेट
केळी – ०५ कॅरेट + ०२ डझन
नारळ – १२ कॅरेट
खरबूज – ०१ कॅरेट




















Join Our Whatsapp Group