पिंपरी (Pclive7.com):- दूषित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रश्नावरून तसेच गोठा कराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विकास साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. निषेधाचे बॅनर परिधान करून त्यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

चिखली, मोरे वस्ती, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती आणि साने चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे आर्थिक भारही वाढला आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक विकास साने यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. “नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना गोठा कराच्या माध्यमातून शेतकरी आणि स्थानिक नागरिकांवर अन्याय केला जात आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
महापालिका सभागृहात निषेध बॅनर परिधान करून प्रवेश केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. या प्रश्नावर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group