‘पवना बंद पाइपलाइन योजना’ तातडीने पूर्ण करण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि अशुद्ध पाण्याच्या समस्येवरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बंद पडलेली ‘पवना बंद पाइपलाइन योजना’ तातडीने पूर्ण करण्याची मागणी श्रुती वाकडकर यांनी केली.

सभेत बोलताना श्रुती वाकडकर म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, पुनावळे, ताथवडेसह शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी अशुद्ध पाणीही मिळत आहे. नियमित कर भरूनही नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दर महिन्याला लाखो रुपये खर्च करून टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ‘पवना धरण बंद पाइपलाइन योजना’ तातडीने कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना पूर्ण झाल्यास पाणीगळती रोखण्यास मदत होईल तसेच नागरिकांना नियमित, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी प्रशासनाला अनेक थेट प्रश्न विचारले. कर भरूनही नियमित पाणीपुरवठा का होत नाही? कमी दाबाने आणि अशुद्ध पाणीपुरवठा होण्यामागील कारणे काय? नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ का येत आहे? तसेच ‘पवना बंद पाइपलाइन योजना’ अद्याप प्रलंबित का आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले.
टँकरमुक्त पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी ‘पवना बंद पाइपलाइन योजना’ तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी ठाम मागणी श्रुती वाकडकर यांनी केली. प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.




















Join Our Whatsapp Group