पिंपरी (Pclive7.com):- देहूरोड परिसरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली असून, गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केलेल्या या कारवाईत आरोपींकडून ९ देशी कट्टे, ५ मॅगझिन आणि ४६ जिवंत काडतुसे असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. तसेच, दोन वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दुलहमीद शेख (वय ३०, रा. महाराष्ट्र कॉलनी, येरवडा), वैभव अडसूळ (वय ३१, रा. काळेवाडी, पुणे), सौरभ लाड (वय २६, रा. पाषाण) आणि अजयराज कांबळे (वय ३२, रा. पाषाण) यांचा समावेश आहे.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध अग्निशस्त्रांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत होते. यावेळी उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली ही कारवाई शहरातील अवैध शस्त्रसाठ्यावर मोठा आळा घालणारी ठरली आहे.




















Join Our Whatsapp Group