पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने पठारे मळा, चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय पाटील रोड या ठिकाणी असलेल्या अनधिकृत लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित बिल्डरकडून सुमारे ७० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

उप आयुक्त राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत परवाना निरीक्षक धनंजय पाटील, राजू वेताळ, किशोर गावडे, राजू चौधरी, धनसिंग धायगुडे, परवाना लिपीक कालिदास शेळके सहभागी झाले होते तसेच धडक कारवाई पथकातील जवान आणि मजूर उपस्थित होते. हायड्रॉलिक मशिनरीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
उप आयुक्त राजेश आगळे यांनी नुकताच आकाशचिन्ह व परवाना विभागाचा पदभार स्विकारला असून यापुढेही अशा प्रकारे अनधिकृत जाहिरात फलक, कमान आदींवर निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शहरातील बेकायदेशीर फलक,कमानींवर निष्कासन कारवाई करण्यात येत असून महापालिका यंत्रणा अशा अनधिकृत अतिक्रमणावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरीकांनी आणि व्यावसायिकांनी यामध्ये सहकार्य करणे अपेक्षित असून त्यांनी स्वत:हून अनधिकृत फलक, कमानी आदी हटविणे गरजेचे आहे अन्यथा महापालिकेमार्फत ते काढण्यात येतील व त्याचा संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे,शिवाय संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे.– चंद्रकांत इंदलकर, सह आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका