पिंपरी (Pclive7.com):- नुकताच महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर), रावेत येथे एका दिवशी ६५ पेटंट्सची नोंदणी करत महाराष्ट्र दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत एक नवीन विक्रम केला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पेटंट्स पीसीसीओईआर मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नोंदवले आहेत. एकूण १३० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ६५ पेटंट्सचे लेखन करून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने बौद्धिक संपदा कार्यालय (पेटंट ऑफिस) मुंबई येथे यांची नोंद केली गेली. या उपक्रमाचे नियोजन बौद्धिक संपदा हक्क विभागाचे समन्वयक डॉ. राहुल बावणे यांनी केले.
जगामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान उंचाविण्याकरिता तसेच देशाला पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्यासाठी नाविन्नपूर्ण संशोधन होणे व बौद्धिक संपदा हक्कांची नोंदणी होणे अत्यावश्यक असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी व्यक्त केले.
नोंदणी झालेल्या पेटंट्स मधील निवडक कल्पनांवर उत्पादन निर्मिती प्रक्रियेस पीसीसीओईआरने सुरुवात केली असून विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारी आर्थिक मदत महाविद्यालय देत आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.