पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जनतेचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, झपाट्याने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या मनसे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आमच्यावर सोपवली. या सात वर्षांच्या कार्यकाळात पक्ष तसेच जनता जनार्दनाचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्यांच्या प्रेमामुळे आम्हाला महापालिकेत ‘नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष, स्मार्ट सिटी संचालक, गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही संधी माझ्यासाठी केवळ सन्मानाची नाही, तर जबाबदारीचीही होती.

यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला. “हे सात वर्षे म्हणजे संघर्ष, सेवा आणि समाजाभिमुख कामगिरीची साक्ष आहेत,” असे सांगत त्यांनी विशेषतः शेतकरी, कामगार, युवक, महिलांसाठी उभे केलेली आंदोलने आणि उपक्रम यांची आठवण करून दिली. ते पुढे म्हणतात की, तुमच्या विश्वासामुळे, अथक मेहनतीमुळे, आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच आज आपण कार्यरत आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने दिवस-रात्र एक करून ही चळवळ उभी केली आहे. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आगामी काळातही आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहोत.”
दरम्यान, “ही सात वर्षे म्हणजे केवळ प्रशासनाची जबाबदारी नव्हे, तर जनतेच्या सेवेत समर्पित असलेला एक प्रवास होता. या काळात मला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी मनसेचा, सर्व नागरिकांचा, सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे. “जनतेच्या विश्वासास पात्र ठरणे हीच माझी खरी ताकद असून, येणाऱ्या काळात अधिक जोमाने विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार मी व्यक्त करतो.” ही लढाई आता जबाबदारीत रूपांतरित झाली आहे. आम्ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर जनतेच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी काम करत आहोत. पारदर्शकता, विकास आणि लोककल्याण हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. हीच झुंजार वृत्ती पुढील काळातही कायम ठेवून, तुमच्या प्रत्येक हक्कासाठी मी झगडत राहीन. असे सचिन चिखले यांनी प्रसिद्धीस दिलेला निवेदनात म्हटले आहे.