पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री भररस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, यात तिचा मृत्यू झाला होता. चिंचवड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला. यात शेजाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची रविवारी (दि.११) रात्री हत्या करण्यात आली होती. कोमल जाधव ही वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे. रविवारी कोमल घरात होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतले. कोमल घरातून बाहेर आली. ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा मृत्यू झाला होता.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यात पोलिसांना २४ तासातच यश आले. कोमल जाधवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ४५ वर्षीय उदयभान यादव (मुख्य आरोपी) आणि त्याचा सख्खा भाचा अभिषक रणविजय यादव (वय २१ वर्षे, रा. सादिकपूर, जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश सध्या वास्तव वाल्हेकरवाडी) अशा दोघांना अटक केली. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्याचबरोबर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केली.