आतापर्यंत आठ वेळा संसदरत्न, एकदा महासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने सन्मान
पिंपरी (Pclive7.com):- लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्या टर्ममध्ये ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील दोन टर्ममध्ये आठ वेळा संसदरत्न, एकदा महासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने बारणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. हे केवळ मावळच्या जनतेमुळे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बारणे यांची पुरस्कारासाठी निवड केली. बारणे यांच्यासह सुप्रिया सुळे, भर्तृहरी महताब, एन.के.प्रेमचंद्रन यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या खासदारांनी १६, १७ व्या लोकसभेत अतिशय चागले चांगले कामकाज केले. १८ व्या लोकसभेतही त्यांचे उत्तम कामकाज सुरू आहे.
चालू १८ व्या लोकसभेत खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी १३८ प्रश्न विचारले आहेत. ३५ चर्चामध्ये सहभाग घेतला तर, ३ खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांची सभागृहात ९६ टक्के उपस्थिती आहे. या कामगिरीसाठी त्यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर, याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सलग आठ वेळा प्रदान करण्यात आला आहे. संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहिताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.
लोकांमधील खासदार
संसदेत उपस्थित राहणे, मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठविण्याबरोबरच लोकांमध्ये मिसळणे, चोवीस तास उपलब्ध असणारे खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ओळख आहे. नम्र, सतत लोकांना भेटणे, त्यांच्या अडी-अडचणींना धावून जाणे, सुख, दु:खात सहभागी होतात. दोन जिल्ह्यात मतदारसंघ असतानाही खासदार बारणे हे सातत्याने मतदारसंघात असतात. त्यामुळे लोकांमधील खासदार अशी बारणे यांची मतदारसंघात ओळख आहे.
संसदेतील भाषणांबरोबच जमिनीवरही काम
खासदार बारणे यांनी केवळ संसदेत आवाज उठविला नाही. तर, प्रत्यक्षात जमिनीवर काम देखील केले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मावळमधील आदिवासी पाडे, वाड्या वस्त्यांवर वीज, रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गावा-गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा सक्षम केली. स्व:खर्चाने पवना धरणातील गाळ काढून पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याची सोय केली. पिंपरीत पासपोर्टचे कार्यालय सुरु केले. क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. एच.ए. कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली. पवना, इंद्रायणी नदी सुधारच्या प्रकल्पाला गती दिली आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. पनवेलला लोकल सुरु झाली. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत समावेश रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. लोणावळा ते पुणे या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. संसदेतील भाषणांबरोबरच जमिनीवरही खासदार बारणे यांनी काम केले आहे.
मावळच्या जनतेला पुरस्कार अर्पण
दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग तीनवेळा माझ्यावर विश्वास टाकला. मोठ्या मताधिक्याने लोकसभेत निवडून पाठविले, त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. हा पुरस्कार म्हणजे मावळवासीयांसाठी करत असलेल्या कामाला मिळालेली पावती आहे. हा पुरस्कार माझा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे. त्यांच्यामुळेच मी हे काम करु शकलो. त्यामुळे मी हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.