चिखली (Pclive7.com):- जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने चार दुचाकी पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली येथील साहिल पुरम हाऊसिंग सोसायटी, राजे शिवाजीनगर, जाधववाडी येथे (दि.०५) रोजी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश निवृत्ती मराठे (वय ५३ रा. साहिल पुरम हाउसिंग सोसायटी, राजे शिवाजीनगर, जाधववाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बाळासाहेब प्रमोद खरात (वय ३२ रा. साहिल पुरम हाऊसिंग सोसायटी चिखली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली येथील साहिल पुरम हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणारा आरोपी गणेश मराठे याने जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी बाळासाहेब खरात यांची होंडा शाईन मोटरसायकल क्र. एमएच 11 सीटी 1019 हिच्या पेट्रोल टाकीचा पाईप काढून माचीसच्या साह्याने पेटवून दिली. तसेच बाजूला पार्क असलेल्या एमएच 42 डब्ल्यू 3159 सुझुकी एक्सेस, एमएच 11 सीए 3180 बजाज 135 पल्सर, एमएच 14 सीए 3827 बजाज डिस्कवर, एमएच 14 जीएल 9225 होंडा एक्टिवा, एमएच 4 जीटी 2422 सुझुकी एक्सेस, क्रांती कुमार कडूळकर यांच्या मालकीची इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि सोसायटीतील इतर सायकली या देखील आग लावून पेटवून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी गणेश मराठे याला अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खारगे पुढील तपास करीत आहेत.