कॅबिनेटमंत्री डॉ. उदय सामंत यांची विधिमंडळ सभागृहात ग्वाही;भाजपा आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनात लक्षवेधी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा (DP) अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही. गोरगरिबांची घरे बाधित होणार नाहीत. देवस्थानच्या जमिनींवर पडलेल्या आरक्षणांची तपासणी करुन रद्द केली जातील, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी आज सभागृहात दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नगर रचना विभागाने शहराचा प्रारुप विकास आराखडा दि. 15 मे 2025 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. दि. 14 जुलैपर्यंत हरकती-सूचना मांडता येणार आहेत. या आराखड्यावरुन शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या आक्षेपांसह पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातील भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

आमदार शंकर जगताप म्हणाले की, डीपी तयार करताना चुकीच्या पद्धतीने केला आहे. बांधकाम परवाने घेतलेल्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे. पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द केले आणि त्या ठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकले आहे. HCMTR मधील साडेतीन किलोमीटरवर लिनिअर गार्डन विकसित केले आहे. पण, प्रारुप विकास आराखड्यामध्ये त्याचा विचार केलेला नाही. आहे तसे आरक्षण ठेवले आहे. थेरगाव येथेसुद्धा हजारो नागरिक बेघर होणार आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मंत्रीमहोदय यांना माहिती दिली. त्यामुळे मंत्रीमहोदय यांनी गोलगोल फिरवणारे उत्तर दिले. सभागृहाला अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. बांधकाम परवागनी घेतलेले आरक्षणे रद्द करावीत.
एमआरटीपी अधिनियम 1966 अन्वये कलम 22 अन्वये सुधारित आराखड्यामध्ये आरक्षणे प्रस्तावित केली जातात. डीपीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तक्रारी आणि सूचनांचा विचार केला जातो. त्यानंतर प्रारुप आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी जातो. आराखड्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार शासनाला आहेत. पूर्वीपासून असलेल्या देवळांवर आरक्षणे पडली असतील, तर ती तापासून घेणार आहोत. शासन कोणावरही अन्याय होवू देणार नाही. हरकती आणि सूचनांचा विचार करुन पिंपरी-चिंचवडचा डीपी निश्चित केला जाईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. घरमालकांवर अन्याय होणार नाही, अशी शासनाची भूमिका आहे आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– उदय सामंत, कॅबिनेट मंत्री.






















Join Our Whatsapp Group