पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत एक अनोखा आणि चर्चेचा राजकीय पेच निर्माण झाला आहे. एकाच जागेसाठी दोन वेगवेगळ्या पक्षांकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दोन प्रभागांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 20 ‘ब’ आणि 30 ‘अ’ या दोन जागांवर हा प्रकार घडला आहे. प्रभाग 20 ‘ब’ साठी नीलम म्हात्रे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गट शिवसेनेकडून एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग 30 ‘अ’ साठी संदीप गायकवाड यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट शिवसेनेकडून एबी फॉर्म घेत अर्ज सादर केला आहे.

निवडणूक प्रक्रियेनुसार उमेदवाराने एका पक्षाचा एबी फॉर्म जोडूनच उमेदवारी अर्ज दाखल करणे अपेक्षित असते. मात्र या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म जोडल्याने छाननी प्रक्रियेत दोन्ही अर्ज वैध ठरले. छाननीवेळी एका पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्याची संधी उपलब्ध असतानाही ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही.

यामुळे आता अर्ज माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच आज 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या दोन्ही उमेदवारांना एका पक्षाची निवड करून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जर ठरलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर निवडणूक आयोग हस्तक्षेप करणार आहे.

अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोग संबंधित उमेदवाराने सर्वात आधी ज्या पक्षाचा एबी फॉर्म आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्या पक्षाचीच उमेदवारी अंतिम मानणार आहे. अशा स्थितीत उमेदवाराकडे कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपूर्वी नीलम म्हात्रे आणि संदीप गायकवाड यांनी नेमकी कोणत्या पक्षाची निवड करणार, याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group