पिंपरी (Pclive7.com):- महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना आज रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात प्रचाराचा मोठा धडाका पाहायला मिळणार आहे. महायुतीचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार प्रचारामुळे शहराचे राजकीय वातावरण तापले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबई आणि नाशिकमधील कार्यक्रम आटोपून सायंकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता भोसरीतील पीएमटी चौक येथे त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला असून, याद्वारे भारतीय जनता पार्टीकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या रोड शोसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारपासूनच शहरात तळ ठोकणार आहेत. दुपारी ४ वाजता हॉटेल कलासागर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ पासून जाधववाडी (मोशी), इंद्रायणी नगर, चक्रपाणी वसाहत आणि दिघी रोड अशा चार ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडणार आहेत. याशिवाय, शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील बांधवांच्या मेळाव्यालाही ते संबोधित करणार आहेत.
प्रचाराच्या तोफा दोन दिवसांत थंडावणार असल्याने, आजचा ‘सुपर संडे’ मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभर राजकीय हालचालींना वेग येणार असून, प्रचाराचे शिखर गाठले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






















Join Our Whatsapp Group