पिंपरी (Pclive7.com):- मकर संक्रांतीच्या दिवशीच पिंपरी चिंचवड शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रहाटणी फाटा परिसरात आज दुपारी भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. धनगर बाबा मंदिरासमोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला असून, या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृत बहिणींची नावे ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०) अशी असून त्या पुनावळे परिसरातील रहिवासी होत्या. अपघाताच्या वेळी दोघी बहिणी दुचाकी (एमएच १४ केएम ९९६८) वरून जात होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच ४० डीसी ०९६४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दोघींनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर ट्रक जितेंद्र निराळे (मूळ रहिवासी – मध्य प्रदेश) चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती देताना काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट म्हणाले की, चालकाला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group