पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभेतून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगत होती. अजित पवार यांनी याबाबत स्पष्टपणे बोलणे टाळले होते. मात्र आज सांगवी येथे झालेल्या तरूणांच्या मेळाव्यात पार्थ यांनी अजित पवारांसोबत हजेरी लावल्याने मावळच्या रिंगणात उतणार असल्याची तयारीच सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आज सांगवी येथे तरूणांसाठी आयोजित जॉब फेअर मेळाव्याचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार हे देखील हजर होते. त्यावेळी स्वत: पार्थ यांना मावळच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी ‘अजितदादांना विचारा’ असं उत्तर दिले. तर अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या फ्लेक्सवर पार्थ यांची झळकत असलेली छबी बरेचकाही बोलून दाखवत आहे.
शिवसेना-भाजपला मावळ मतदारसंघातून टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. संजोग वाघेरे पाटील आणि भाऊसाहेब भोईर यांनी लोकसभा लढण्यासाठी इच्छूक आहेत. पार्थ यांची राजकीय एन्ट्री झाली असली तरी भविष्यात शरद पवार आणि अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.























Join Our Whatsapp Group