पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू आहे. सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वच मतदारसंघाचा आढावा घेतला असून अनेक दिग्गजांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यात शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांचाही समावेश आहे. या मतदार संघातून शिवसेनेला टक्कर देण्यासाठी लांडे यांचेच नाव आघाडीवर असून लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शिवसेना, भाजप यांच्यात युतीच्या चर्चेला वेग आला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी निश्चित झाली असून जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची त्यांनी चाचपणी केली आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या संभाव्य उमेदवारांना तयारीला लागण्याचे संकेत स्वत: पवारांनी दिलेत.
शिरूर लोकसभा सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा येथून निवडूण येण्याची किमया केलीय. येत्या निवडणूकीत त्यांची विजयाची घोडदौड रोखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान असणार आहे. आढळरावांना चितपट करण्याची ताकद भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यातच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान स्वत: शरद पवार यांनी देखील विलास लांडे यांच्या नावाला हिरवा कंदील दिला असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच विलास लांडे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. मतदार संघातील नेत्यांच्या गाठीभेटी तसेच मतदारांच्या भेटीवर लांडे यांनी भर दिल्याचे पहायला मिळत आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यात शिरूरमधून विलास लांडे यांचे नावच आघाडीवर आहे. राष्ट्रवादीतील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलास लांडे यांची उमेदवारी निश्चित झाली असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group