पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड दर्शन बस उद्या दि.३ पासून सुरू होणार आहे. वातानुकूलीत बस या मार्गावर धावणार असून प्रती व्यक्ती ५०० रूपये शुल्क असणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते निगडीत दुपारी ३ वाजता बस सेवेचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पुणे शहराच्या धर्तीवर ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये पिंपरी चिंचवड शहराची माहिती देण्यासाठी ‘गाईड’ पुण्याचे असणार आहेत. त्यासाठी पीएमपीएलकडून दोन वातानुकूलित बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची क्षमता ३२ आसनाची आहे. प्रती व्यक्ती ५०० रूपये शुल्क असणार आहे. पीएमपीएलच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उपशहरातील दोन मार्गावरुन या बस धावणार असून सकाळी साडे आठ वाजता निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून ही बस सुटणार आहेत. त्यात तिर्थक्षेत्र देहू आणि आळंदीचा समावेश करण्यात आला आहे. सायन्स पार्क, बर्ड व्हॅली उद्यान व इतर ठिकाणी असलेले शुल्क संबंधित व्यक्तीस स्वत: भरावे लागणार आहे. एक बस सकाळी साडेआठ वाजता निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकातून सुटणार आहे. तेथून रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर बंधू स्मारक, सायन्स पार्क, संभाजीनगरची बर्ड व्हॅली, निगडीची दुर्गा देवी टेकडी, अप्पूघर असे फिरून तिर्थक्षेत्र देहूगाव मार्गे निगडीत परतणार आहे. हे अंतर ४३.५० किलोमीटर आहे. तर, दुसरी पिंपरी चिंचवड दर्शन बस भोसरी चौकातून सुटून आळंदीत दर्शन होणार आहे. तेथून लांडेवाडीतील शिवसृष्टी दाखविली जाणार आहे. त्यानंतर बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, दुर्गादेवी टेकडी व भक्ती-शक्ती समुह शिल्प दाखविले जाणार आहे. समारोप सायंकाळी सहाला भोसरीत होणार आहे. हे अंतर ५१.३० किलोमीटर अाहे अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली