पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडीमध्ये टसर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि.१५ मार्च २०२० रोजी राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याचे हे ३ रे वर्षे आहे.
माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गेली ३ वर्षे राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. पहिल्या वर्षी २२, तर गेल्या वर्षी ५५ विवाह या सोहळ्यात लावण्यात आले आहेत. यावर्षी कमीतकमी १०१ जोडप्यांचे विवाह संपन्न होतील असे स्पोर्टस् फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क वधूवरांकडून घेतले जात नाहीत. तसेच सोहळ्यामध्ये सर्व धार्मिक विधी, साखरपुडा, हळदी समारंभ आदी कार्य विधीपूर्वक केले जाते. त्याचप्रमाणे नवदांपत्यास संपूर्ण पोशाख तसेच संसार उपयोगी वस्तू मोफत दिल्या जातात.
या विवाह सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, खासदार गिरीषजी बापट, माजी मंत्री राम शिंदे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप तसेच प.पू गुरुमाऊली आण्णासाहेब मोरेदादा उपस्थित राहणार आहेत. तरी या विवाह सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर राहुल जाधव यांनी केले आहे. ज्यांना या विवाह सोहळ्यामध्ये नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी राहुलदादा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.