पिंपरी (Pclive7.com):- हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडितेच्या हत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. ११) आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापौर माई ढोरे, माजी महापौर राहुल जाधव, महिला आघाडी प्रदेश नेत्या उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला आघाडी अध्यक्षा शैला मोळक, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, नगरसेविका प्रियांका बारसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, राजेंद्र लांडगे, माजी नगरसेवक आर. एस. कुमार, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, वीणा सोनवलकर, आशा काळे, गिता महेंद्रु, राजश्री जायभाय, शोभा भराडे, शहर सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात, प्रमोद निसळ, महेंद्र बाविस्कर, विजय शिनकर, प्रकाश जवळकर, नंदु कदम, कैलास सानप, दिपक नागरगोजे, गणेश ढाकणे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “हिंगणघाटमध्ये घडलेली घटना महाराष्ट्राच्या मातीला आणि पुरोगामित्वाला काळीमा फासणारी आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. आता अशा घटना न होण्यासाठी अत्यंत कडक कायद्यांची गरज आहे. या घटनेतील पीडितेच्या हत्येस जबाबदार आरोपीला लवकरात लवकर फाशी देऊन महाराष्ट्र अशा घटना सहन करणार नाही हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. तसे झाले तरच असे क्रूर कृत्य करणारे आरोपी महाराष्ट्रात तयार होणार नाहीत, असे म्हणाले.”