पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना भाजीपाला, फळे मिळण्यासाठी उद्या (दि.१५) पासून शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडे बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु होणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तर, फेरीवाल्यांद्वारे भाजीपाला व फळे विक्रीवर बंदी कायम ठेवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडे बाजार दि.११ एप्रिलपासून दि.१४ एप्रिल पर्यंत पुर्णता बंद करण्यात आले होते. दरम्यान आता देशातील लॉकडाऊनचा ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या दि.१५ पासून भोसरी, चिखली, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, थेरगाव, वाकडमधील भाजी मंडई खुली राहणार आहे. तसेच सर्व आठवडे बाजार आणि मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीचे व्यवहार सुरु राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीतच हे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजी मंडईत सम तारखेला सम क्रमांकाचे गाळे आणि विषम तारखेला विषम क्रमांकाचे गाळे चालू राहतील. शेतकरी आठवडे बाजारातील स्टॉलमधील तीन ते चार फुटाचे अंतर राखावे. गाळेधारकांनी सामासिक अंतर व सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे निर्देश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत. तसेच फिरते विक्रेत्यांबाबत वेगळे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत फेरीवाल्यांद्वारे भाजीपाला व फळे विक्रीवर बंदी कायम ठेवण्यात आले असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.