पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी महापालिकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात मिळकत कराच्या माध्यमातून ५७७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.
महापालिकेला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या करसंकलन विभागाला गेल्या वर्षी करोनामुळे फटका बसला. महापालिका सभेने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ८७० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात ३१ मार्चअखेर या विभागाने ५७७ कोटींचा टप्पा ओलांडला. त्याआधी २०१९-२० या वर्षात या विभागाला ७५० कोटींचे उद्दिष्ट होते, तेव्हा ४८७ कोटी ७६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.
यंदा तुलनात्मकदृष्ट्या १०० कोटींचे जास्त उत्पन्न मिळाले. एकूण उत्पन्नातील २४८ कोटी रकमेचा भरणा नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने केला आहे. मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवली. त्या अंतर्गत ३५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली. सर्वाधिक ११५ कोटींचे उत्पन्न थेरगाव विभागातून तर सर्वांत कमी ६ कोटींचे उत्पन्न पिंपरीनगर विभागातून महापालिकेला मिळाले आहे.