नदी सुधार, नियमित पाणी पुरवठा, कचरा, उद्योगधंदे, शिक्षण, रोजगार यावर बोलण्याचे आव्हान
भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेच्या विद्यमान आमदारांनी गेल्या दहा वर्षात काय कामे केले असा प्रश्न विरोधकांनी विचारल्याने केवळ ‘दाम पे चर्चा’ करणाऱ्या भोसरीच्या आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विरोधकांना ‘काम ना धाम’ असे म्हणणाऱ्यांनी आमदारांचे एक ठोस काम दाखवावे असे प्रत्युत्तर आता भोसरी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
भोसरी विधानसभेतील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. भोसरी विधानसभेच्या भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या कामाबाबत सध्या महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी तर उघडपणे आमदार महेश लांडगे यांच्या दहशत, दडपशाही आणि दादागिरीच्या कारभाराला आव्हान दिले आहे. नमामि इंद्रायणी प्रकल्पाच्या कामावरून आमदारांवर थेट हल्लाबोल करत उबाळे यांनी आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रात आमदारांच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘गजर’ केला. उबाळे यांच्यासोबतच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आमदार लांडगे यांच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले असल्यामुळे आमदार लांडगे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून विरोधकांवर ‘काम ना धाम’ अशी टीका होत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
आमदार साहेब दहा वर्षातील एक ठोस काम दाखवा..
2014 ते 2024 या दहा वर्षातील कालावधीत आमदार साहेब आपण केलेले एक ठोस काम दाखवा असे आव्हानच आता भोसरी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश लांडगे यांना दिले आहे. गल्लीबोळातील कामे करायला रस्ते, फुटपाथ करायला नगरसेवक, पालिका प्रशासन सक्षम आहे. तिथे कुदळ आणि फावडा घेऊन आपण जाता. कामाचे क्रेडिट घेता असे देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.नदी सुधार, नियमित, व्यवस्थित पाणी पुरवठा, कचरा, उद्योगधंदे, शिक्षण, रोजगार यावर आमदारांनी काम करायला हवे होते असे देखील शिवसेनेने म्हटले आहे.