मावळ (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीला आता अनेक महिने उलटले आहेत. याबबातची सुनावणी निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि जेष्ठ नेते शरद पवार एकत्रित यावे असं अनेक नेते म्हणतात. अशातच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून आता थेट आमदारांमध्ये देखील सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कालपासून (शनिवारी) अजित पवार यांच्या आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा सूर आवळला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशीच भावना आमदारांनी व्यक्त केली आहे. अशातच या नेत्यांना एकत्र आणण्याचं स्वप्न एक महत्त्वाकांक्षी नेता पुर्ण होऊ देणार नाही असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार-अजित पवारांच्या एकत्रित येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी पाहता आज कोण कोणत्या पक्षांमध्ये जाईल आणि कोणाशी युती होईल याचा काही विश्वास आणि ताळमेळ राहिलेला नाही. भविष्य काळात अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्रित यावं असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील वाटतं. ते दोघे एकत्र आले तर आम्हाला आंनदच असेल पण हे स्वप्न काही महत्त्वकांक्षी नेता पुर्ण होऊ देणार नाही असं अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे. तर तो महत्त्वकांक्षी नेता कोण आहे, शेळकेंचा रोख कोणाकडे आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.