पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात ऑक्सिजन गळतीचा प्रकार काहीवेळापूर्वी घडलाय. वायसीएम हे ८०० बेडची क्षमता असलेले रुग्णालय असून सध्या इथे ४०६ कोरोनाबधित रुग्ण उपचार घेत आहेत. टँकरमधून आणलेला ऑक्सिजन एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये भरताना प्रेशर जास्त झाल्याने सेफ्टी वॉल लिकेज झाला आणि मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना आहे.
ऑक्सिजनची गळती झाल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच तात्काळ तांत्रिक विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. वॉलची दुरुस्ती केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनी दिली.
हा सगळा प्रकार नाशिकमध्ये घडलेल्या गॅस गळती घटनेची पुनरावृत्ती करणाराच होता, पण लगेच परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाकीच्या मर्यादेपेक्षा जास्त गॅस भरला गेल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, साडे सातच्या सुमारास जेव्हा वायसीएम येथील एका टाकीमध्ये एलएमओ भरला जात होता. तेव्हा टाकीच्या दाबात चढ-उतार झाल्यामुळे दबाव कमी होता. जास्तीत जास्त दाब चालविण्यासाठी व सोडण्यासाठी असलेले सेफ्टी वॉल्व्ह खराब झाला. पर्यायी सुरक्षित वॉल्व्ह त्वरित वापरण्यासाठी ठेवले होते. तथापि, ही टाकीची सुरक्षा यंत्रणा असल्याने टाकीमधून कोणतेही नुकसान झाले नाही किंवा प्रत्यक्ष गळती झाली नाही.
वायसीएममध्ये ३०० आंतररूग्ण आहेत. आणि रूग्णालयात दीड तासाचा बॅक अप आहे. ज्या टँकमधून हा प्रेशर सोडला गेला होता तो ओ २ ते ३० बेडचा आयसीयू आणि १०० रूग्ण असलेल्या रुग्णालयाच्या एका मजल्याचा पुरवठा करत होता. ऑक्सिजन सुविधेचे सीओईपीच्या बायोमेडिकल विभागाने ऑडिट केले. सध्या रुग्णालयातील सर्व रुग्ण व टाक्या सुरक्षित आहेत. मी या ठिकाणी भेट दिली आणि त्याची खात्री केली आहे.
























Join Our Whatsapp Group