पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करा, अशी मागणी पिंपरी युवासेनेने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे केली आहे.
युवासेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुगेवाडी येथे (दि. २८) सकाळी सुमारे ९.३० च्या दरम्यान मडके कुटुंबाचे राहते घर कोसळले. घरामध्ये दुर्घटनेवेळी दोन मुली व त्यांची आई घरात उपस्थित होते. स्थानिक रहिवासी पोलीस प्रशासन अग्निशामक दल रेस्क्यू टीम यांच्या सहकार्याने घर कोसळत असताना प्रथम एक मुलगी व आईला वाचविण्यात यश आले. अजून काही भाग कोसळल्याने घरात मातीच्या ढिगाऱ्याखाली पौर्णिमा मडके अडकून राहीली. तीन तासाच्या अथक प्रयत्नातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
परंतु मध्यमवर्गीय असलेल्या मडके कुटुंबावर एक प्रकारे संकटच कोसळले हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे राहते घर क्षणातच नाहिसे झाले. घरात पौर्णिमाचे वडील एकटेच कमवते आहेत. शिपायाची नोकरी त्यातच उदरनिर्वाहासह कुटुंब सावरणे व नवीन घर बांधणे अवघड आहे. तरी सदर कुटूंबाचा गांभीर्याने विचार करत मडके कुटुंबाला आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक मदत करण्यात यावी याबाबचे निवेदन अति आयुक्त विकास ढाकणे यांना देण्यात आले.
त्याप्रसंगी युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, उपशहरप्रमुख युवासेना राजेंद्र तरस, शहर सन्मवयक युवासेना रूपेश कदम, चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, अविनाश जाधव, मोसीन शेख, पिंपरी युवासेना युवा अधिकारी नीलेश हाके यांच्यावतीने सर्व पदाधिकाऱ्यासह पीडित कुटुंबाची भेट घेऊन घटनास्थळी पाहणी करण्यात आली व महापालिकेकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.