पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. महापालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. दरम्यान, आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व असल्याने आठही अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे.
महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग अध्यक्षांचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो. एप्रिल महिन्यात नवीन प्रभाग अध्यक्षांची निवडणूक होते. परंतु, कोरोनामुळे प्रभाग अध्यक्षाच्या नवीन नेमणुका करू नयेत, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्यामुळे विद्यमान प्रभाग अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली होती. सात महिने त्यांना मुदतवाढ मिळाली.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. निर्बंध शिथिल झाले आहेत. आता २९ ऑक्टोबर रोजी प्रभाग अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. एका प्रभागाची झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची निवडणूक होणार आहे.
फक्त दोन महिन्याचा कालावधी
महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिला आठवड्यात लागेल. त्यामुळे नवीन प्रभाग अध्यक्षांना केवळ दीड ते दोन महिन्याचा कालावधी मिळणार आहे. मागील पावणेपाच वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी किमान शेवटच्या दोन महिन्यांसाठी प्रभाग अध्यक्ष हे पद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आठही प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे.
























Join Our Whatsapp Group