मुंबई (Pclive7.com):- उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडत असताना विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेलाही वेग आला आहे. येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचीही नावं निश्चित झाली आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यावर शिक्कमोर्तब झालं आहे.

या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे खडसे आणि निंबाळकर हे दोघेही आज उमेदवारी अर्ज भरतील. विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात. भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरला असून पाचव्या उमेदवार उमा खापरे यांनी देखील आज अर्ज भरला आहे.
हे आहेत सर्व पक्षांचे उमेदवार..
भाजप – प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना – सचिन अहिर, आमशा पाडवी
काँग्रेस – भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे
राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर
असे असेल मतांचे गणित..
विधान सभेत भाजपचे 106, आघाडीचे 152, अपक्ष 13 आणि छोटे पक्ष 16 असे एकूण 287 आमदार आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत. हे मतदान गुप्त पद्धतीने केले जाते. सध्याच्या राजकीय संख्याबळानुसार, भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. पण भाजपने पाचवाही उमेदवार दिला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसने दोन उमेदवार दिले आहेत. पण त्यांना दुसरा उमेदवार निवडून येम्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसचा दुसरा आणि भाजपचा पाचवा उमेदवार यापैकी एक निवडून येणार असल्याने या दोघांमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
10 जागांसाठी निवडणूक
विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त होत आहेत. यापैकी 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर एका आमदाराचा मृ्त्यू झाला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे येत्या 20 जून रोजी 10 जागांसाठी निवडणूक होत आहे.
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम..
आज 09 जूनपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी होईल.
13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
20 जून रोजी मतदान प्रक्रिया होईल.
20 जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.
20 जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.























Join Our Whatsapp Group