पिंपरी (Pclive7.com):- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गटाकजून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पुणे जिल्ह्यातून कुणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि राहुल कुल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये १२ ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांचे आमदार आहेत. ९ ठिकाणी भाजपाच्या विचारांचे आमदार असले तरी, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात भाजपाचा प्रभाव वाढवायचा असेल, तर मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोडीचा नव्या दमाच्या आणि लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या चेहऱ्याची भाजपाला नितांत आवश्यकता आहे.
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव सर्वाधिक दिसतो. या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक लक्ष केंद्रीत करतील. भाजपा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील घराघरांत भाजपाचा विचार रुजवण्यासाठी फडणवीस त्याच ताकदीच्या चेहऱ्याला मंत्रीमंडळात स्थान देतील, हे निश्चित आहे. सध्यस्थितीला पुणे जिल्ह्यातील प्रदेशाध्यक्ष, कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची नावे चर्चेत आहेत. राजकीय पटलावर संबंधित तिघांचा तुलनात्मक विचार होणार यात शंका नाही. त्यानिमित्ताने कोणाची बलस्थाने आणि आव्हाने काय आहेत? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न फडणवीस करतील, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.
महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघातून २०१४ मध्ये अपक्ष निवडणून आले होते. २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर राज्यातील भाजपा आमदारांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अशी भाजपात ओळख आहे. बैलगाडा शर्यत, इंद्रायणी थडी जत्रा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आदींमुळे महाराष्ट्रभरात लोकसंपर्क आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नातीगोती आणि कामगार संघटनेच्या माध्यमातून मावळ, खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली आदी तालुक्यांमध्ये प्रभाव असलेले नेता म्हणून ओळखले जातात. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पक्षामध्ये कोणताही ‘गॉडफादर’ नाही.
दौंड मतदार संघातून तीनवेळा निवडून आलेले सुभाष कुल आणि एकदा निवडून आलेल्या रंजना कुल यांचा मुलगा म्हणून राहुल कुल यांची विशेष ओळख आहे. २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर कुल यांनी बाजी मारली. त्यांच्या पत्नी कांचन कुल या मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईक आहेत. तसेच, कांचन यांना बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
























Join Our Whatsapp Group