कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या विविध सवलतींचा तब्बल २ लाख मिळकत धारकांनी लाभ घेतला आहे. या मिळकत धारकांनी ३० जून अखेर महापालिका तिजोरीत २५० कोटी रुपयांचा कर भरणा केल्याची माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली आहे. तसेच १ हजार कोटींचे उदिष्ट पूर्ण करणारच असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ५ लाख ७८ हजार मिळकतींची नोंद आहे. गेल्या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने ६२५ कोटींचा कर वसूल केला होता. मात्र, २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी १ हजार कोटी रुपयांचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार पहिल्या तीन महिन्यात तब्बल २५० कोटींची वसूली करण्यात या विभागाला यश आले आहे.
मालमत्ता कर विभागाने या वर्षीपासून अनेक सेवा ऑनलाईन केलेल्या आहेत. थकबाकी नसल्याचा दाखला, महिला, दिव्यांग, पर्यावरण पूरक सोसायटी अशा अनेक सवलती ऑनलाइन अर्जाद्वारे दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा ऑनलाईन कर भरणा करण्याकडे कल वाढलेला आहे.
तसेच पर्यावरण पूरक निवासी सोसायटी मालमत्ता यांना सामान्य करामध्ये जवळपास १० टक्के पर्यंत सवलत दिली गेल्यामुळे आता महापालिकेला त्याचा ऑनलाइन कर भरण्यामध्ये उपयोग झाला आहे. एकूण दोन लाख मालमत्ताधारकांपैकी जवळपास १ लाख ३० हजार मालमत्ताधारकांनी ३० जून पूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाईन भरलेला आहे.
यावर्षी १ हजार कोटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर संकलन विभाग कटिबद्ध असून लोकसेवा अधिनियमातील अधिसूचित केलेल्या एकूण बाराही सेवांचा लाभ नागरिकांना ऑनलाइन मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा पारदर्शी, जबाबदारीचे प्रतीक, प्रतिसादशील व वेगवान पद्धतीने देता याव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना
करण्यात येत आहेत.
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्यापासून कर वसूली नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३० जून पूर्वी जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी आगाऊ कर भरणा सवलत व ऑनलाईन सवलत अशी एकूण सामान्य करामध्ये पंधरा टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले होते. आज ३० जून रोजी जवळपास दोन लाख मालमत्ताधारकांनी आपला संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरलेला असून मालमत्ता कराची एकूण वसूली २५० कोटी झालेली आहे.– नीलेश देशमुखसहाय्यक आयुक्त, कर संकलन विभागपिंपरी चिंचवड महानगरपालिका
























Join Our Whatsapp Group