पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेने प्राधिकरणाच्या जागेवर शहरात आजी-माजी महापौरांना एकत्रित राहण्याच्या दृष्टीने आरक्षित ठेवलेल्या अडीच एकर जागेवर नियोजित महापौर निवासाचा प्रश्न गेली २५ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या जागेवर महापौर निवास बांधण्यासाठी लवकर प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करुन माझ्या कार्यकाळात भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरात अ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सेक्टर नं.२७ मधील अडीच एकर जागेवर महापौर निवास बांधण्यात येणार होते. पण, गेल्या २५ वर्षांपासून महापौर निवासाचा प्रश्न रेंगाळला आहे. याबाबत नवनगर विकास प्राधिकरणाने सुमारे १० हजार ४५० स्वेअर मीटर जागा (तब्बल अडीच एकर) महापालिकेला कराराद्वारे दिलेली आहे. हा करार १९९१ मध्ये महापालिका आणि प्राधिकरण यांच्यात झालेला आहे. तसेच या कराराद्वारे निगडी प्राधिकरणातील सेक्टर नं.२७ मध्ये दुय्यम सुविधा केंद्राची इमारती उभारण्यात येणार होती.
महापालिकेने अडीच एकर जागेवर दुय्यम सुविधा केंद्राऐवजी महापौर निवास बांधण्याचा प्रस्ताव हा बोओटी तत्वावर अधिकाऱ्यांनी बनविला होता. त्यामुळे ती जागा विकसित करण्यासाठी महापालिकेने मान्यताही दिली आहे. २००१ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. याबाबत एका खासगी कंपनीला काम देण्यात आले. परंतू, प्राधिकरणाची जागा बीओटी तत्वावर विकसित करता येत नसल्याने ती निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. तसेच ही जागा न्यायालयीन प्रक्रियेतून महापालिकेने ताब्यात घेतली आहे. त्या जागेवर अ प्रभागाने वॉल कंपाऊंड, किरकोळ दुरुस्ती आणि गेट बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, महापालिकेच्या आतापर्यंत महापौरांच्या कार्यकाळात निवासाचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिलेला आहे. त्यामुळे महापौर निवासाचे माझ्या कालावधीत किमान भूमिपूजन करुन कामास सुरुवात करणार असल्याचेही काळजे यांनी यावेळी सांगितले.