पिंपरी (Pclive7.com):- व्यसनमुक्ती केंद्रात दाखल तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पाटीलनगर, चिखली येथील मनोविकास व्यसनमुक्ती केंद्रात शुक्रवारी (दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. व्यसनांमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सेामनाथ यशवंत सुतार (वय २४, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सुतार यांना व्यसने असल्याने कुटुंबियांनी त्यांना चार दिवसांपूर्वी चिखली येथील पाटीलनगर येथे असलेल्या मनोविकास व्यवसमुक्ती केंद्रात दाखल केले होते.

या केंद्रात दाखल होणाऱ्यांचे नियमित समुपदेशन करून व्यसनमुक्त होण्यााबबत मार्गदर्शन केले जाते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास केंद्रात दाखल असलेल्या सर्वांना मार्गदर्शन करून चर्चा करण्यात येत होती. सोमनाथ सुतार हेही त्यात सहभागी झाले होते. त्यावेळी सोमनाथ हे उठून केंद्रातील वरच्या खोलीकडे गेले. त्यानंतर जिन्यात कपड्यांच्या साह्याने गळफास घेतला.
ही बाब केंद्रातील इतर काही जणांच्या निदर्शनास आली. त्यानंतर सुतार यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात दिला.
सोमनाथ यांचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन बहिणी असा परिवार आहे. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यानंतर तीन-चार दिवसांतच सोमनाथ यांनी आत्महत्या केली. त्यामुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group