पिंपरी (प्रतिनिधी):- निगडी येथील साईनाथनगर येथे असलेल्या साईबाबा मंदिराचा जिर्णोध्दार व साईंच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. हा सोहळा बुधवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील हजारोंच्या संख्येंने भाविकांनी दर्शन घेतले. स्थानिक नगरसेवक मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे यावेळी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील साईनाथनगर येथे ४० वर्षापूर्वीचे साईबाबांचे मंदिर आहे. परिसरातील नागरिकांचे हे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाते. येथील रमणलाल बाफना, गणेश बाफना, रवि बाफना यांनी पुढाकार घेऊन साईंच्या या मंदिचा जिर्णोध्दार केला. या ठिकाणी साईंच्या या भक्तांनी अतिशय सुंदर अशा मंदिराची उभारणी केली अाहे. शिर्डीतील साई मंदीरात आल्याची भावना येथे आलेला भक्त व्यक्त करतो आहे.
साईंच्या या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी दि.१० रोजी संध्याकाळी श्रीं चा पालखी सोहळा संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी साई चरित्र, सामूहिक पारायण पठन करण्यात आले. तसेच बुधवारी दि.११ रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मुर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता साईबाबांची आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.