पिंपरी (Pclive7.com):- कोरोना काळानंतर पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच चिंचवडगावातील पवना नदी घाटावर उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव आज रविवारी (दि. ३०) रोजी भव्य प्रमाणात निर्बंधमुक्त साजरा करण्यात आला. या उत्सवात हजारो उत्तर भारतीय कुटुंबांनी भक्तिभावाने सुर्योपासना केली. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

आज रविवारी (दि. ३०) रोजी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छटमाईची पूजा मांडून तिथे विधिवत पूजा करण्यात आली. या मांडणीमध्ये उसाला महत्व असते. चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून उसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेऊन त्यावर दिवा पेटवला आणि त्यावर विटाची मांडणी करून पूजेची मांडणी केली. त्यासमोर खवा, गव्हाचं पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखविला आणि गाईच्या दुधाचे सूर्याचा अस्त होताना महिलांनी अर्घ्य दिले.
संस्कृती व निसर्गाचे रक्षण करणारा छटपूजा उत्सव उत्तर भारतात विशेषता: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि नेपाळ लगत असणा-या प्रदेशात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत करतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचिन काळापासूनची श्रध्दा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरणाप्रती समर्पणाची भावना आहे. आयोजकांच्या वतीने पवना घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. भाविकांच्या ”जय छठमाता” च्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते. उद्या सोमवारी (दि. ३१) रोजी याच घाटावर सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक विजय गुप्ता यांनी दिली.
छठपूजा उत्सवात हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, शामसुंदर प्रसाद, उमाशंकर गुप्ता, अशोक गुप्ता, अभि पटेल, राजकुमार गुप्ता, अमित गुप्ता, मुन्नाप्रसाद गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते खंडुशेठ चिंचवडे, हरेराम कुंभार, अनिल गुप्ता, भावेश गुप्ता आदींनी मोलाचे सहकार्य केले.
”गेल्या २० ते २५ वर्षांपासून आम्ही या ठिकाणी छटपूजेचा उत्सव साजरा करत आहोत. येथील स्थानिकांचे देखील या उत्सवामध्ये आम्हाला चांगले सहकार्य लाभते. दोन दिवसांचा हा उत्सव असतो आज षष्ठीला सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस अर्घ्य दिले जाते. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून आमचे उत्तर भारतीय बांधव हा उत्सव साजरा करण्याकरीता पवना घाटावर जमतात. एकमेकांना शुभेच्छा देतात आणि समाजात सुख-शांती लाभो अशी प्रार्थना करतात. ”
– विजय गुप्ता – अध्यक्ष, हनुमान मित्र मंडळ, कार्याध्यक्ष, छठ पूजा समिती.
























Join Our Whatsapp Group