पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जादा गुण संपादन करणाऱ्या १४० गुणवंत विद्यार्थ्यांना आणि १० दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांनी यंदा एक लाखाचे बक्षीस पटकावले आहे. या विद्यार्थ्यांच्या बक्षिसापोटी महापालिकेचा ५६ लाख ७५ रुपये खर्च होणार आहे.
माध्यमिक विद्यालयातील गुणवंत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जादा गुण संपादन करणाऱ्यांना बक्षीस देण्यात येते. दहावीचा निकाल १७ जूनला लागला. महापालिका माध्यमिक विद्यालयांचा निकाल यंदा ८९ टक्के लागला आहे. सन २००८-२००९ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. सन २०१५-१६ या वर्षापासून या योजनेत बदल केला आहे.
त्यानुसार, महापालिकेच्या १८ माध्यमिक विद्यालयातील ९० टक्क्यांपेक्षा जादा गुण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. ८५ ते ८९.९९ टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या ४६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळविणाऱ्या ८७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. ३५ टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविणाऱ्या आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या १० दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. असे एकूण १५० विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.