पिंपरी (Pclive7.com):- पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतून शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी आज (सोमवारी) माघार घेतली आहे. बँकेच्या प्रगतीसाठी माघार घेत भोईर यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक असलेल्या पवना सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक 9 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 46 जणांनी अर्ज दाखल केले होते. पूर्वी 8 उमेदवारांनी माघार घेतली आहे. अर्ज माघार घेण्यासाठी उद्यापर्यंत मुदत आहे. त्याच्या एकदिवस अगोदर भाऊसाहेब भोईर यांनी माघार घेतली आहे.
माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह सर्वांच्या विनंतीला मान देत माघार घेतली. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे. भोईर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, माजी नगरसेवक नाना लोंढे, शत्रुघ्न काटे उपस्थित होते. भोईर यांनी माघार घेतल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसून येते.
दरम्यान, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर करण्यात आले आहे. सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शिवाजी वाघेरे, शामराव फुगे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, चेतन गावडे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, बिपीन नाणेकर, सचिन काळभोर तर अनुसूचित जाती गटातून दादू डोळस, महिला राखीव गटातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर, इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांचा पॅनेलमध्ये समावेश आहे.