पिंपरी (Pclive7.com):- सकाळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून मोबाइल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ६० मोबाइल फोन आणि १४ लॅपटॉप जप्त केले. या कारवाईमुळे वाकड, निगडी, चिंचवड, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील २३ गुन्ह्यांची उकल झाली. सौंदराजन गोविंदन (२१, रा. तामिळनाडू), गुनासेकर शंकर (२१), तामीलारसन सुखवानीबाग (रा. भोसरी. मूळ रा. तामिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाइल फोन चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. त्याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गस्त घालण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे. वाकड पोलिस गस्त घालत असताना त्यांना उघड्या दरवाजावाटे चोरी करणारा एक संशयित सापडला. त्याच्याकडे चौकशी करत वाकड पोलिसांनी त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार संदीप गवारी, वंदू गिरे, स्वप्निल खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, सतीश पिल्लामारी, सागर पंडित यांच्या पथकाने ही कामगिरी केली.