पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची ‘हॅटट्रिक’ केलेले खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आठ जूनला शपथविधी होणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल, याविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
नव्या संसदेमध्ये शिवसेनेचे एकूण सात खासदार असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद व एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज (गुरुवारी) मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या खासदारांमध्ये ज्येष्ठता व अनुभवात बारणे हे पहिल्या दोन क्रमांकात बसत असल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे.
बारणे यांना गेली दहा वर्षे संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे व चर्चांमध्ये सहभागी होणारे खासदार म्हणून संसद रत्न, संसद महारत्न आशा पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सात वेळा गौरविण्यात आले आहे. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. लोकसभेचे पीठासन अधिकारी पदावर बसण्याचा बहुमान हे त्यांना मिळाला आहे. दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. बारणे यांना प्रशासकीय कामे करून घेण्याचा अनुभव देखील दांडगा आहे. या बारणे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा तर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा निवडून आले आहे. राज्यात मंत्रिपदाचा अनुभव असलेले छत्रपती संभाजीनगरचे संदिपान भुमरे प्रथमच लोकसभेत जाणार आहेत. ठाण्याचे खासदार मस्के व उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करता बारणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानण्यात येत आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळते की राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागते, एवढाच उत्सुकतेचा विषय आहे.
























Join Our Whatsapp Group