पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील साई चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल आणि वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचा नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी आढावा घेतला.
यावेळी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खलाटे, उपअभियंता नाईक, कनिष्ठ अभियंता तालीखेडे, बीआरटीएस उपअभियंता संदेश खडतरे, बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता अभिजित दहाडे, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता कावळे, पाणीपुरवठा अधिकारी धुमाळ आणि संबंधित काँट्रॅक्टर्स उपस्थित होते.
यावेळी शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी सर्व कामांची पाहणी केली. साई चौक येथील औंध-रावेत उड्डाणपूल एक बाजू जुलै महिनाअखेर पर्यंत पुर्ण करून नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. तसेच कोकणे चौक ते साई चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सायकल ट्रॅक मुळ रस्त्यात विलीन करून वाहतुकीस जास्त जागा उपलब्ध करण्याचेही सुचविण्यात आले. साई चौक येथील शिवार चौक ते सावित्रीबाई फुले उद्यानापर्यंत अंडरपास कामाबद्दल शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी चर्चा केली.
साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळण वळण असलेले परिसरातील चौक आहे. परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये आयटी कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणारा वर्ग व रहिवासिंयांना वाहतुकीचा प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा आणि पुण्याला जाण्यास अत्यंत सोपे आणि सोयीस्कर होणार आहे. वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूलामुळे साई चौक येथे होणार्या सततच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.