पिंपरी (Pclive7.com):- पुणे शहरात कुरियर एजंटकडून एका महिलेवर झालेल्या अत्याचाराची घटना घडली. त्यापार्श्वभूमीवर “कुरियर डिलिव्हरी एजंट”बाबत कठोर नियमावलीसाठी शिवसेनेच्या रणरागिणींनी पुढाकार घेतला आहे. पुणे जिल्हा निबंधक दिपक तावरे यांना भेटून त्यासंदर्भात निवेदन दिले आहे. घरोघर कुरिअर पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी कुरिअर एजंटबाबत तातडीने कठोर नियमावली जारी करावी व संभाव्य धोक्यापासून महिला मुलींचे रक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांच्यासोबत संपर्कप्रमुख सौ.पूजा खोतकर, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष सौ.अक्षता धुमाळ, कसबा विधानसभा उपशहरप्रमुख अश्विनी मल्हारे आदी उपस्थित होत्या.

सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच पुणे शहरामध्ये एका दुर्दैवी घटनेमध्ये एका व्यक्तीने कुरियर डिलिव्हरी एजंटच्या वेशात एका महिलेच्या फ्लॅट मध्ये प्रवेश करून त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्व सोसायटीधारकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये जे ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलिव्हरीच्या निमित्ताने अनेक अनोळखी चेहऱ्यांची ये – जा सुरु असल्याकारणाने आपणास त्याबाबत कडक नियमावली करणे गरजेचे आहे.

नियमांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा केल्या तर अश्या गोष्टींना आळा बसेल…
१) सर्व डिलिव्हरी एजंट यांना सुरक्षारक्षकाकडे नाव, मोबाइल नंबर, कंपनीचे नाव नोंदवणे बंधनकारक करावे.
२) डिलिव्हरी एजंट यांचे ओळखपत्र, त्यावरील फोटो व कंपनीचे पत्र याची तपासणी करावी.
३) सदर डिलिव्हरी एजंट यांचा वाहन क्रमांक, सिक्युरिटी पास, स्वतंत्र रजिस्टर, ज्या फ्लॅट मध्ये जायचे आहे त्यांची पूर्वपरवानगी, ट्रॅकींग टॅग, मोबाईल अँप द्वारे रिअल टाइम अपडेट तपासणे.
४) सोसायटीच्या प्रत्येक मजल्यावर आपात्कालीन कॉल बटन तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा नंबर असावा.
५) सोसायटीच्या मिटिंग मध्ये महिला सुरक्षिततेबद्दल जागरूकता करणेबाबत कार्यक्रम असावेत.
६) संबंधित कर्मचारी ज्या कंपनीमध्ये काम करत आहेत त्या कंपनीने चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक करावे.
वरील सुरक्षा उपायांना कायदेशीर बंधनकारक स्वरूप प्रदान करून राज्यस्तरावर व्यापक अशी नियमावली बनवण्यात यावी. व सर्व गृहनिर्माण संस्थांना नियमावली पाळणे बंधनकारक करावे. तसेच नागरिकांमध्ये घबराट होऊ नये म्हणून पोलीस अधिकारी व सोसायटी चेअरमन यांचेमध्ये संवाद घडवावा अशी मागणी सुलभा उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.