पिंपरी (Pclive7.com):- शिक्षणाला वयाची कोणतीच अट नसते हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका कमल घोलप यांनी दाखवून दिलयं. वयाच्या ३९ वर्षी त्यांनी दहावीची परिक्षे दिली अन् ७२ टक्के गुण मिळवत पास देखील झाल्यात. राजकारण, संसार करत असताना जिद्द आणि इच्छा शक्ती असेल तर सर्वच शक्य होतं हे त्यांनी सिध्द करून दाखवलयं. त्यांना मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून सर्वांपुढे त्यांनी एक आर्दश ठेवला आहे.
कालच दहावी शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नगरसेविका घोलप या एसएससी बोर्डाची ही परीक्षा ७२ टक्के गुणांनी उर्तीण झाल्या. शाळा सोडल्यानंतर तब्बल २१ वर्षांनी नगरसेविका कमल घोलप या दहावीची परीक्षा उत्तिर्ण झाल्या असून दोन मुलांची आई असणाऱ्या घोलप आता ३९ वर्षांच्या आहेत.
सध्या त्या निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका असून त्या “फ” क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. महापालिकेची रोज विविध कामे आटपून, प्रभागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांनी मिळालेल्या वेळेत अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी प्रभागातील कामे, घर, संसार संभाळून घोलप यांनी हे यश कमावले. नगरसेविका असलेल्या घोलप यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती पण वडिलांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या इच्छेवर पाणी सोडावे लागले होते.
आपल्या यशाबाबत बोलताना नगरसेविका घोलप म्हणाल्या, वडीलांची घरची परिस्थीती बेताची होती. त्यामुळे शिक्षण ९ वीतच सोडावे लागले, लग्नही लवकर झाले. लग्नानंतर घर संभाळण्याची जबाबदारी आली. त्यामुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. आता मुले मोठी झालीत, दोन्ही मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांचीत प्रेरणा घेऊन दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला माझ्या पतींनी पूर्णपणे पाठींबा दिला. आज त्यांच्यामुळेच मला हे यश संपादन करता आले.
कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठी मजल मारली तरी शिक्षणाशिवाय सर्व शून्यच असते. शिक्षणामुळे बौद्धिक विकास साधला जातो आणि त्यातून अन्य विकासाच्या वाटा निर्माण होतात. कमल घोलप यांच्या या यशामुळे त्यांचे प्रभागातील नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.





















Join Our Whatsapp Group