पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड दहावीची परीक्षा पास झाल्या आहेत. त्यांना ५५ टक्के गुण मिळाले आहेत. स्थायी समिती सारखे महत्वाचे पद सांभाळत त्यांनी अभ्यास करुन दहावीची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झाल्या. त्यांच्या या यशाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
काल दहावी शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नगरसेविका ममता गायकवाड ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. ममता गायकवाड या भाजपच्या तिकीटावर प्रथमच प्रभाग क्रमांक २६ पिंपळेनिलख, विशालनगर, धनराज पार्क, वेणूनगर प्रभागातून निवडून आल्या आहेत. महापालिकेच्या आर्थिक नाड्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या त्या सभापती आहेत. शहराच्या विकासाचे नियोजन स्थायी समितीमध्ये केला जाते. अनेक धोरणात्मक निर्णय स्थायीत घेतले जातात. गायकवाड यांनी महापालिकेची रोजची विविध कामे आटपून, प्रभागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन मिळालेल्या वेळेत अभ्यास केला.
नगरसेविका गायकवाड यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. परंतु, मुले लहान असल्यामुळे त्यांची ती इच्छा पूर्ण होत नव्हती. आता मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यंदा त्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला. परीक्षा सुरु असतानाच त्यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद आले. त्यातून त्यांनी वेळ काढून अभ्यास केला आणि यश मिळविले.
याबाबत बोलताना ममता गायकवाड म्हणाल्या, ‘पहिल्यापासून उच्च शिक्षणाची आवड होती. परंतु, मुले लहान असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी अडचण येत होती. मुले मोठी झाल्यानंतर दहावीची परीक्षा देण्याचा निश्चय केला. यंदा परीक्षेसाठी अर्ज भरला. स्थायी समिती अध्यक्ष होण्याअगोदरच परीक्षेचा अर्ज भरला होता. परीक्षा सुरु असतानच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली. त्यातून वेळ काढून अभ्यास केला. महापालिका, मुले, संसार आणि अभ्यास अशी चौपदरी तारेवरची कसरत करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले.’





















Join Our Whatsapp Group