पिंपरी (Pclive7.com):- भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विचार “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेवर आधारित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शताब्दी पंचसूत्रीतील प्रमुख विषय ‘पर्यावरण’ या दोन्हीचा संगम साधत एक अद्वितीय व ऐतिहासिक उपक्रम शाहूनगरात साकार होत आहे.

या उपक्रमाचा उद्देश दुहेरी आहे तो म्हणजे मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन करणे. पर्यावरण संवर्धनाचे भान निर्माण करून पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा उभारणे. यासह या उपक्रमांतर्गत अश्वत्थ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात येणार असून, हा वृक्ष केवळ शाहूनगरच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

हा समारंभ आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता संभाजीनगर येथील छत्रपती शिव शाहू संभाजी उद्यानात पार पडणार आहे. या कार्यक्रमात आमदार अमित गोरखे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे, वृक्षारोपणाचा हा ऐतिहासिक सोहळा माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे या मातृशक्तीच्या हस्ते संपन्न होणार असून, मातृसन्मानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा उपक्रम डी वाय पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पर्यावरण संरक्षणास हातभार लावणे हे या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे. या माध्यमातून नागरिकांना “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेचे महत्त्व पटवून देत, मातृस्मृती व पर्यावरण संरक्षण या दोन्हींचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

सदर कार्यक्रम हा समाजजीवनात पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक बळकट करणारा आणि मातृप्रेमाची कृतज्ञ आठवण जपणारा ठरेल. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group