पिंपरी (Pclive7.com):- वारकऱ्यांना भेट वस्तू देण्याची परंपरा बंद करणाऱ्या भाजपवर राष्ट्रवादीने सडकून टीका केली. वर्षभरात भाजपने केवळ भ्रष्टाचार केला त्यामुळे महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे म्हणूनच भाजपला वारकऱ्यांना भेट वस्तू द्यायला ही पैसे नाहीत अशी जोरदार टीका विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी केली. भाजप ‘नास्तिक’ आहे, त्यांना वारकऱ्यांच्या भावनेशी, परंपरेशी काही देणे घेणे नाही असा हल्ला चढवतानाच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू द्या असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते कार्यालयात दत्ता साने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संताची भूमी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. दरवर्षी महापालिकेकडून दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो हि परंपरा अाम्ही अखंडपणे चालू ठेवली होती. गेल्या वर्षी ताडपत्री खरेदी केलेल्या भ्रष्टाचारामुळे सत्ताधारी भाजपाची नामुष्की झाली. म्हणूनच यंदा त्यांनी वारकऱ्यांना भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेतलायं. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करतो. वर्षभर भ्रष्टाचार करत यांनी महापालिकेची तिजोरी लुटून खाल्ली आहे. यांना सांप्रदायाशी काहीच देणे-घेणे नाही. सत्ताधारी आता नास्तिक झालेत. त्यांच्याकडे पैसे नसतील तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू द्यावी असे मत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केले.





















Join Our Whatsapp Group