पिंपरी (Pclive7.com):- सरपंच थाळी, पाटील थाळी, सावकार थाळी, कारभारी थाळी… या प्रकारचे नाव असलेल्या थाळ्या कदाचित तुम्ही कधी ऐकल्या नसतील. मात्र, या नावाच्या भल्या मोठ्या थाळ्या खवय्यांना पुण्यात मिळत आहेत. पुण्यातील औंध-बाणेर लिंक रोडवरील तात्याचा ढाबा इथे या थाळ्यांत खवय्यांना मेजवानी देण्यात येते. या थाळींची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगू लागली असून पुण्यासह पिंपरी चिंचवडकरांच्या पसंदीस या थाळ्या येऊ लागल्या आहेत.
सरपंच, पाटील आणि सावकार या नावाने सुरू झालेल्या मांसाहारी थाळ्या, या तिन्ही भारदस्त नावांना शोभतील अशाच आहेत. ही नावे जशी भारदस्त आणि मोठी वाटतात, तसाच या थाळ्यांचाही मोठा रूबाब आहे. एकाच थाळीत जवळपास आठ ते दहा जण मनोसक्त जेवू शकतील अशा आकाराच्या या थाळ्या आहेत. मटण, चिकण, मासे, सुकी कलेजी, खिमा, काळा रस्सा, तांबडा रस्सा, मटण सूप, अंडी, पापड, साजूक तुपातील इंद्रायणी राईस, डाळ खिचडी, चार प्रकारच्या भाकरी, ताक, सोल कडी आणि कोशिंबीर असा भला मोठा मेनू एकाच वेळी एकाच थाळीत खवय्यांच्या सेवेत दाखल होतो. त्यामुळे एकाच मोठ्या थाळीत या मोठ्या नॉनव्हेज मेनूच आस्वाद घेण्यासाठी पुणेकरांसह पिंपरी चिंचवडकर मोठी पसंती दाखवत आहेत.
सरपंच, पाटील आणि सावकार यांच्या नावात जसा मोठा रुबाब आहे, तसा मोठा रुबाब ही थाळी खाताना तुम्हाला अनुभवता येणार आहे. त्यामुळे या मोठ्या आकाराच्या नॉन व्हेज थाळ्या सध्या खवये पुणेकरांन मोठी भुरळ घालत आहेत.
थाळींचे दर –
सरपंच थाळी (मटण) – २१००, सावकार थाळी(गावरान चिकन) – १६०० (५ ते ७ लोकांसाठी)
पाटील थाळी (मटण), १६०० कारभारी थाळी (चिकन)१२०० (३ ते ५ लोकांसाठी)